दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून शहरासोबतच ग्रामीण भागातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहरातील भाजी बाजारासह गर्दीच्या ठिकाणांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत मास्क वापरा व कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहन नागरिकांना केले. तसेच नियमांचे काटेकोर पालन न केल्यास कठोर कारवाई करा असे आदेश पोलिस व नगरपालिका अधिकाऱ्यांना दिले.
छगन भुजबळ यांनी येवला शहरातील विविध भागातील गर्दीच्या भागाची पाहणी केली. प्रथमतः येवला शहरातील शनी पटांगण येथे भाजी मार्केटची पाहणी केली. त्यानंतर शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी भेटी दिल्या. या दरम्यान त्यांनी फळविक्रेते, हॉटेल यासह विविध दुकानात प्रत्यक्ष भेट देऊन मास्क वापरण्याचे व कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. मास्क आणि सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, विक्रेते, नागरिक यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.
भुजबळ यांनी येवला शहरात नागरिकांशी संवाद साधल्यानंतर येवला उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील कोविड लसीकरण विभागाची व डेडिकेटेट कोविड केअर सेंटरची पाहणी करून रुग्णाशी संवाद साधत विचारपूस केली. तसेच नियोजनाबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.यावेळी येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत खैरे यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते.