धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला ‘हा’ निर्णय

210

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं होतं. या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मात्र, आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी आज राष्ट्रवादीने मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, हे आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं अशी मागणी भाजपने केली आहे. सोबतच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘हे आरोप गंभीर असून राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत चर्चा करून लवकरात लवकर पक्ष म्हणून निर्णय घेतला जाईल’ असे म्हटले होते.