पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदार संघात एकूण 524 मतदार केंद्रांवर मतदान पार पडेल. स्व. आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके रिंगणात आहेत. तर भाजप पक्षाकडून समाधान औताडे आपले नशीब अजमावत आहेत.
वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्षांसह एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, चुरशीची लढत भालके आणि आवताडे यांच्या मध्येच होत आहे. आता या अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सत्ताधारी महविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अनेक विद्यमान मंत्र्यांनी मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या होत्या. भाजपनेही मोठी फळी मैदानात उतरवत आपली शक्ती दाखवून दिली होती.
त्यामुळे निवडणुकीत एकच चुरस पाहायला मिळाली.
स्व. आमदार भारत भालके यांच्या जाण्याने सहानुभूती म्हणून मतदार त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्या पारड्यात मत देणार की अन्य पर्यायाचा विचार करणार हे निकालातून स्पष्ट होईल. तूर्तास राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांनी विजयाचा विश्वास बोलून दाखवला आहे.