राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी करून दाखवलं, २९५ बेडचे सुसज्ज कोविड सेंटरचे शरद पवारांनी केलं उद्घाटन

89

संपूर्ण देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी राज्यस्तरावर अनेक प्रयत्न सुरू आहेत. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने रुग्णांना उपचाराकरीता बेड मिळणे कठीण झाले आहे.

या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने नाशिक शहरात सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. आज या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

भुजबळ कोविड केअर सेंटरच्या उभारणीसाठी मेट भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समता परिषद व नाशिक महानगरपालिका यांचा मोलाचा वाटा आहे. या सेंटरमध्ये १८० ऑक्सिजन तर ११५ सीसीसी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आज या सेंटरचे उद्घाटन करताना संपूर्ण सेंटरची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.

तसेच हे काम शरद पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. राज्यातील सर्व साखर कारखाने, शिक्षण संस्था व मोठे उद्योगधंदे प्रत्येकाने या लढाईत सहभाग घ्यावा व आपल्या भागात अशा प्रकारचे कॅम्प उभारावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले.