ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिल्यास, आमदार निधीतून त्या गावाला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूकिमुळे गावचा संघर्ष कमी होईल, आणि गावचा विकास यातून साधता येईल, असे आमदार लंके म्हणाले होते.
आमदार निलेश लंकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पारनेर तालुक्यातील तब्बल ३० ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहेत. आमदार निलेश लंके यांच्या बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. त्यांनी दिलेल्या ऑफरनंतर अनेक ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 30 ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आणखी 10 ग्रामपंचायत बिनविरोध होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण 40 ग्रामपंचायत बिनविरोध होतील अशी परिस्थिती आहे.
मतदारसंघातील निवडणूका बिनविरोध होण्यासाठी आ. निलेश लंके यांनी गावे पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. संबंधित गावात बैठका घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात आधी राळेगणसिद्धी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर पानोली व कारेगाव ही गावे बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. आणि आता एकूण ३० ग्रामपंचायत पर्यंत हा आकडा गेला आहे.