ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिल्यास, आमदार निधीतून त्या गावाला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूकिमुळे गावचा संघर्ष कमी होईल, आणि गावचा विकास यातून साधता येईल, असे आमदार लंके म्हणाले होते.
त्यानंतर अनेक आमदारांनी अशा ऑफर द्यायचा धडाका सुरू केला आहे. त्यानंतर मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनीही अशीच ऑफर दिली होती. त्यानंतर चक्क राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास शिरूर मतदारसंघातील गावांना तब्बल ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
आतापर्यंत आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील पारनेर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. मतदारसंघातील निवडणूका बिनविरोध होण्यासाठी आ. निलेश लंके यांनी मतदारसंघातील गावे पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावात बैठका घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात आधी राळेगणसिद्धी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर पानोली व कारेगाव ही गावे बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.