बेळगावात मराठी तरुणाला लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा; जयंत पाटील म्हणतात देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खुश करण्यात व्यस्त

90

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच इथल्या मराठी जनांना, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येथे शुभम शेळके यांना पाठिंबा देत आहे. असे सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बेळगावात पत्रकारांशी बोलतान केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार, छगन भुजबळ, यांनी अनेक वेळा मराठी जनांच्या हक्कासाठी या भागात आंदोलने केली आहेत. महाराष्ट्राची, मराठी जनांची एकजूट कायम रहावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहतो, हा पाठिंबाही त्याचाच भाग असल्याचं पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खुश करण्यात व्यस्त असतात. दिल्लीला जे बरं वाटेल तेच ते करतात. महाराष्ट्रातही आम्हाला त्याचा प्रत्यय येतो. कोरोना संबंधित विषय असतील, राज्यातील बाकी मागण्या असतील त्यांनी महाराष्ट्राची बाजू घेणं अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही.

महाराष्ट्रात भाजपने पाच वर्षे सत्ता उपभोगली. त्यावेळीही फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. समितीविरोधात प्रचार करून, भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे त्यावरून सिद्ध झाले. मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम फडणवीस यांनी केले आहे.