राज्यात कोरोना टेस्टिंग व निदान होण्यासाठी लागणारा वेळ हा २४ तासांहून अधिक असू नये हाच राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी टेस्टिंग यंत्रणा कुठल्याही कारणास्तव थांबता कामा नये, तसेच खासगी आरोग्य यंत्रणेचाही यात समावेश करून घ्यावा, अशा सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
टेस्टिंग वाढविण्यासाठी नवीन यंत्रणा आणली असून त्याद्वारे १० हजार टेस्टिंग एकावेळी होऊ शकतील. ही यंत्रणा राज्यात हॉटस्पॉट असलेल्या जागी बसवता येऊ शकेल.
यानिमित्ताने राज्य सरकार पूर्ण भर टेस्टिंग वर देत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने हलगर्जीपणा न करता, कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित टेस्टिंग करावी, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना संपूर्ण आरोग्य विभाग सुरुवातीपासूनच अगदी धैर्याने, हतबल न होता काम करत आहे. अशाच सकारात्मक भूमिकेतून, खचून न जाता, मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन त्यांनी आरोग्य कर्मचार्यांना केले.