वायसीएम रुग्णालयाच्या शौचालयात आढळले नवजात मृत अर्भक

21

पिंपरी येथे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) शौचालयात टॉयलेटच्या भांड्यामध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले आहे. हे प्रकरण शुक्रवारी दुपारी दिडच्या सुमारास घडले आहे. हे अर्भक कोणी टाकले याचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी सुधीर तुकाराम शिर्के (वय 33, रा. ओटास्किम, निगडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वायसीएम रुग्णालयातील जनरल ओपीडी अकरा नंबरच्या समोर महिलांसाठी शौचालय आहे. येथे दुपारी दीडच्या सुमारास सफाई कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शौचालयाच्या भांड्यात स्त्री जातीचे अर्भक दिसून आले. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये अर्भक फेकून दिले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलीसांकडून कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली जात आहे.