नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांचे मरखेल येथे सत्कार

171

देगलूर: तालुक्यातील मरखेल गावातील दोन होतकरू, अंत्यत हलाकीच्या परिस्थितीवर मात करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले उमेदवार रंजना नागनाथराव शिरगिरे व संदीप गंगाधर यामावर यांची गत वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली होती.

भरती प्रक्रियेचा भाग म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक येथे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीरीतीने पूर्ण करून सेवेत रुजू होण्याअगोदर नवनियुक्त पोलिस उपनिरीक्षक रंजना शिरगिरे व संदीप यामावार दोघेही वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद व आप्तेष्टांची भेट घेण्यासाठी गावी आले असता. त्यांच्या कुटुंबीयांनी व त्यांच्या आप्तेष्टांनी त्यांचे जंगी स्वागतकेले.

गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी व अधिकारी होण्याचे स्वप्नं उरी बाळगून त्यानुसारच इतर मुलांनी व त्यांच्या पालकांनी पुढील शैक्षणिक दिशा ठरवावी, त्यांच्या समोर आदर्श निर्माण व्हावा आणि गावातील व परिसरातील जास्तीत जास्त मुलं-मुली स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून अधिकारी व्हावे या हेतूने ग्रामपंचायत कार्यालय मरखेलच्या वतीने सरपंच नागीनबाई मच्छिंद्र गवाले व उपसरपंच संदीप पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच प्रतिनिधी मच्छिंद्र गवाले व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

रंजना शिरगिरे यांना त्यांची पहिली पोस्टिंग मीरा भाईंदर येथे मिळाली असून संदीप यामावार याना नांदेड जिल्ह्यातच पहिली पोस्टिंग मिळाली आहे. अत्यंत मेहनतीने, जिद्दीने, कोणत्याही परिस्थितीत न खचता मिळविलेल्या विशेष यशानंतर त्यांच्या कटुंबियांनाच काय तर संपूर्ण गावकऱ्यांना त्यांचा अभिमान वाटत आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, आलेल्या संकटांची पर्वा न बाळगता, न खचता सातत्याने मेहनत व अभ्यास करत राहिलो तर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण नाही असा या दोन्ही उपनिरीक्षकांच्या निवडीवरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या मुला-मुलींना संदेश मिळाला आहे.