मराठवाडा पदवीधर मतदार संघातून नुकतेच निवडून आलेले राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास केल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा होतेय.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत हॅट्रिक साधली आहे. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे एकाच विमानात प्रवास करत असल्याचे हे फोटो समोर आले आहेत.
काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस औरंगाबाद वरून मुंबईत जात असताना त्याच विमानात राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण प्रवास करणार होते. त्यावेळी त्या दोघांची भेट झाली. यावेळी आमदार सतीश चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूच्या सीटवर बसल्याने त्यांच्या मध्ये राजकीय चर्चा झाली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा होते आहे. सतीश चव्हाण यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा मोठा पराभव केला होता. कदाचित या विजयाचे रहस्य तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विचारत नसावेत ?