‘आमदार विनायक मेटे साहेब उधारी द्या’ जाहिरातीचे पैसे मिळवण्यासाठी बीडमधील वृत्तपत्राने छापली बातमी

43

शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांच्याकडे असलेली जाहिरातीची थकबाकी मिळण्यासाठी बीड मधील लोकाशा नावाच्या वृत्तपत्राने चक्क बातमी छापली आहे. लोकाशा वृत्तपत्रातील बातमीनुसार दिवाळी अंक 2017, 2018 आणि 2019च्या वर्धापनदिनाला आमदार मेटे आणि त्यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीचे पैसे अद्याप दिले नसल्याचं या बातमीमधून सांगण्यात आलं आहे.

लोकाशा वृत्तपत्रातील बातमीत म्हटलं आहे की, ‘सर्वप्रथम आपण फोर्ड कंपनीची गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन. आपण शून्यातून विश्व निर्माण केले याबाबत जनतेला नेहमीच कौतुक राहिले आहे. गावातून मुंबई जिंकण्याची किमया आपण गेली 25 वर्षे साधत आहात. त्याचेही विश्लेषण करता येईल.

मात्र, आजचे प्रयोजन आपल्याकडील उधारी मागण्याचे आहे. महाराष्ट्राचा डोलारा सांभाळताना आपल्याला आठवण राहिली नसेल किंवा आम्हीच आपणास आठवण करुन देण्यास कमी पडलो असू. म्हणून आपल्याला आज जाहीर आठवण करुन देत आहोत’, असं या बातमीमध्ये छापण्यात आलं आहे. या बातमीप्रमाणे विनायक मेटे यांच्याकडे 77 हजार रुपये, तर त्यांचे भाऊ रामहरी मेटे यांच्याकडे 20 हजार रुपये उधारी बाकी असल्याचं सांगण्यात आलं आहे.