NIA च्या अटकेत असलेले पोलीस अधिकारी सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करावी – भातखळकर

71


मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांचे बरेच नातेवाईक हे शिवसेनेत सक्रिय असून त्यांची बहीण व त्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेचे नगरसेवक होते, तसेच सुनील माने यांचा शिवसेनेच्या नेत्यांशी सुद्धा जवळचा संबंध असल्याने त्यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज एनआयए महासंचालकांना पत्र लिहून केली आहे.

मनसुख हिरेन यांना पोलीस अधिकारी तावडे या नावाने कॉल करून घराबाहेर बोलविल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले सुनील माने यांचे शिवसेना कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुनील माने यांची बहीण ही मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथून नगरसेविका होती तर सुनील माने यांच्या त्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेकडून चार वेळा नगरसेवक होते. इतकेच नव्हे तर सुनील माने यांचा सख्खा भाऊ व त्यावेळी नगरसेवक असलेले त्याच्या बहिणीचे पती यांनी पत्रा चाळीतील नागरिकांना घरे रिकामी करण्यासाठी दमदाटी करण्याचा प्रकार केला होता, त्यात सुनील माने यांचा सुद्धा सहभाग होता.


तसेच पीएमसी बँक घोटाळ्यात ज्या शिवसेना नेत्यांना कर्ज मिळाली त्यांच्याशी सुद्धा सुनील माने यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करताना सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सुद्धा चौकशी होऊन ‘दूध का दूध, और पाणी का पाणी’ होण्याची आवश्यकता असल्यानेच आज एनआयएला पत्र लिहून मी ही मागणी केली असल्याचे आमदार भातखळकर म्हणाले.