ग्रामपंचायत निवडणूकीत कोकणात भाजपने चांगले यश मिळवले. त्याच पार्श्वभूमीवर प्रदेश सचिवपदी माजी खासदार निलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत बुधवारी आयोजित कोकण विभागाच्या बैठकीत ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
यावर निलेश राणे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत मिळालेल्या पदाचा वापर महाराष्ट्राच्या सेवेसाठी करणार असल्याचं स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांसह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून पक्षाच्या प्रदेश सचिवपदी माझी निवड केली आहे. कोणतेही पद हे मिरवण्यासाठी नसते. त्यातून पक्षाला रिझल्ट द्यावा लागतो, समाजाची सेवा करावी लागते. त्यामुळे कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी या पदाचा उपयोग करण्याची ग्वाही दिली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिवपदी वर्णी लागली आहे. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाच्या नेत्यांचे विशेष आभार मानले. भाजपाची कोकण विभागीय बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर चंद्रकांत दादांनी प्रदेश सचिव पदाचे पत्र आपणाला सादर करून सुखद धक्का दिला. पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे, पक्ष वाढवणे यासाठी या पदाचा उपयोग मी करणार आहे. राणेसाहेबांचे आमच्यावर संस्कार आहेत. यातून सर्वसामान्यांचे हित जपण्याचा आपण या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत आगामी काळात कोकणात भाजपा वाढला पाहिजे, यासाठी समोर सरकार असो अथवा कोणीही मोठा विरोधक असो, त्यांना अंगावर घेऊन वेळप्रसंगी संघर्ष करत पक्ष वाढविण्याबरोबरच कोकण आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. आपल्या पदाचा फायदा येथील जनतेला कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.