नेत्यांसाठी कार्यकर्ते काय करतील याचा काही नेम नाही.
राजकीय नेत्यांच्या विजयासाठी कार्यकर्ते विविध गोष्टी करताना पाहायला मिळतं. नेता निवडून येत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, चप्पल घालणार नाही, केस कापणार नाही, टोपी घालणार नाही असे अनेक अजब संकल्प आपण ऐकले आहेत. मात्र, बिहार मध्ये नितीशकुमार यांच्यावर प्रेम करणारा एक अवलिया या पेक्षा वेगळा आहे.
नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री होताच एका व्यक्तीनं आपलं चौथ बोट कापून गौरेया बाबाला अर्पण केलं आहे. या व्यक्तीने यापूर्वीही तीन बोटं कापली आहेत. अशा या अजब व्यक्तीची सोशल मिडीयात मोठी चर्चा होत आहे. मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार विराजमान होताच सदरील व्यक्तीनं बोट कापून अर्पण केलं. ही घटना जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
वैना गावातील ४५ वर्षीय अनिल शर्मा उर्फ अली बाबा यांनी चौथ बोट कापून घेतलं. यापूर्वीही नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तीन बोट कापलेली आहेत. यासाठी २००५, २०१० आणि २०१५ मध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर अनिल शर्मा यांनी आपली तीन बोटे कापली होती. मला बोटे कापल्यानंतर आनंद मिळतो असं शर्मा यांनी सांगितलंय.
अनिल शर्मा यांनी यावेळीही नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गोरैया बाबा यांच्याकडे नवस केला होता. त्यांची इच्छा ईश्वरानं पूर्ण केली. त्यामुळे त्यांनी बोट अर्पण केलं. त्यांच्या ह्या अजब नवसामुळे त्यांची मोठी चर्चा होत आहे.