कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंढे साहेब यांच्या जयंतनिमित्त मोठा कार्यक्रम होणार नसून, कोरोनाचे नियम पाळून दर्शन घेण्यात येणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. दरवर्षी गोपीनाथ गडावर होणाऱ्या जयंती कार्यक्रमाला यंदा स्थगिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी, सर्वांनी स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलं. त्या बीडमध्ये समाज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या.
पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, 12 डिसेंबर हा दिवस आपल्या सर्वांना अत्यंत प्रेरणा, ऊर्जा आणि जीवनामध्ये आशा देणारा दिवस आहे. मुंडे साहेब हयात असताना आपण सर्व हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने आणि उत्साहाने साजरा करत होतो. आज ते हयात नाहीत, परंतु आपल्यासाठी ते स्वाभिमानाची प्रेरणा देणारे संघर्षाचा महामेरू आहेत.
12 डिसेंबर हा जन्मदिवस आणि 3 जून ह्या स्मृतीदिनी आतापर्यंत गोपीनाथ गडावर मोठ मोठे नेते, मंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर, छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे उपस्थित राहून संघर्षाच्या या जीवन प्रवासाला आदरांजली अर्पण केली. यावर्षी मात्र दरवर्षी सारखा मोठा कार्यक्रम नसणार आहे.