परभणी शहरासह जिल्ह्यात पहिला व दुसरा डोस घेतलेल्या पैकी एकाही रुग्णाचा अद्यापपर्यंत मृत्यू झाला नाही, असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. आज परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आमदार डॉ.राहूल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, महापालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदी उपस्थित होते.
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 65 हजार 992 व्यक्तीेंनी लस घेतली आहे. त्यापैकी 1 लाख 13 हजार 558 व्यक्तींनी पहिला डोस व 15 हजार 101 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील पहिला व दुसरा डोस घेतलेल्या पैकी एकाही रुग्णांचा अद्यापपर्यंत मृत्यू झालेला नाही, असे ते म्हणाले. या लसीकरण मोहिमेतून फायदाच होतो.
हे स्पष्ट आहे, असे नमुद करीत जिल्ह्यात लसीकरण मोहिम प्रभावीपणे विशेषतः बुथनिहाय राबविण्या संदर्भात प्रशासनाद्वारे नियोजन केले जात आहे, असेही ते म्हणाले. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. केंद्र सरकारद्वारे या अनुषंगाने पुरवठा होत नाही, असा सूर ही पालकमंत्री मलिक यांनी व्यक्त केला. लसीकरण मोहिमेकरिता राज्य सरकार आवश्यक तेवढा पैसा खर्च करावयास तयार आहे, असाही दावा केला. लस आयात करावयास परवानगी मिळाल्यास लस आयात करू असे ते म्हणाले.