ऊ.प्रदेश पोलिसांच्या ट्रॅक्टर मालकांना नोटीसा

8

प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर सरकारने संशयीतांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान ऊ. प्रदेश पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांवर कारवाई करीत २०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर मालकांना नोटीस बजावली आहे.
ऊ.प्रदेश सरकारची ही कारवाई म्हणजे दडपशाहीचे धोरण आहे. तसेच पोलिसांची ही कारवाई शेतकऱ्यांना धमकावण्याचा त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोविंद चौधरी यांनी केला आहे.

 यावेळी ऊ.प्रदेश पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावत यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सिकंदरपूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील २२० ट्रॅक्टर मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे ट्रॅक्टर सार्वजनिक रस्त्यांच्या व्यावसायिक कामांसाठी वापरण्यात येत होते आणि अल्पवयीन मुले हे ट्रॅक्टर चालवत होते. त्यातून काही अपघात झाले आहेत. तसेच, काही ट्रॅक्टर अवैध खाणकामांसाठीही वापरण्यात येत होते, असे सिकंदरपूर पोलिस स्थानकांचे प्रमुख बालमुकुंद मिश्रा यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगीतले.

दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे काढली होती. या रॅलीमध्ये मोठ्याप्रमाणात हिंसाचार झाला होता.

दिल्लीत झालेल्या हिंसाचारनंतर ऊ.प्रदेश सरकारने कारवाईस सुरुवात केली होती. गाझीपूर बॉर्डरवरील शेतकर्‍यांना जबरदस्ती हटविण्याचा प्रयत्न पोलिसांच्यावतीने करण्यात आला होता. या पार्श्वभूमिवरच करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान “हे शेतकरी ट्रॅक्टरसह रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि शेतकऱ्यांची चळवळ दडपण्यासाठीच या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत”असा आरोप राम गोविंद चौधरी यांनी केला आहे.