देशात काँग्रेस केवळ ट्विटर वर शिल्लक राहिली आहे – राधाकृष्ण विखे पाटील

3

देगलूर: तालुक्यातील मरखेल गावात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील भाजप, रिपाई व इतर मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ नांदेड भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या पुढाकाराने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाषणादरम्यान विखे पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या खुमासदार पद्धतीने सत्ताधारी पक्षावर परखडपणे टिका केली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सामनासाठी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीविषयी बोलताना ते म्हणाले की आजपर्यंत मी माझ्या 30-35 वर्षाच्या राजकीय जीवनच्या अनुभवात उद्धव ठाकरेंप्रमाणे धमकीची भाषा करणारे मुख्यमंत्री कधीच पाहिलं नाही.

पुढे महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना ते बोलले की या सरकारने कोणत्याच आश्वासनाची पूर्तता केलेली नाही, शेतकऱ्यांना या सरकारने दिवाळीला अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई देतो म्हणून दिलं नाही. राष्ट्रीय आणि राज्यातील काँग्रेस आता कुठेच उरली नाही ते केवळ ट्विटर वर उरली आहे. राहुल गांधी अधूनमधून कधीतरी एखादं ट्विट करतात तेवढंच. बिहारमध्ये राजदलाही राहुल गांधींचा लहरीपणा भोवला, महाघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे मराठवाड्यातील पदविधरांचे प्रश्न विधीमंडळात कधीही मांडत नाहीत ते केवळ मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न उपस्थित करतात म्हणजेच ते केवळ बिल्डर्सचे प्रतिनिधी आहेत. असे अनेक आरोप आजच्या सभेत पदवीधर मतदारांना मार्गदर्शन करताना विखे पाटील यांनी केले.

औरंगाबाद विभागातील मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सध्या चुरशीची लढत सुरू आहे प्रामुख्याने भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर, महाविकास आघाडीचे उमेदवार आधीच दोन वेळा आमदार राहिलेले सतीश चव्हाण यांच्यातच थेट सामना रंगणार आहे तर त्यांच्यासोबत भाजपमधून बंडखोरी केलेले रमेश पोकळे व प्रहार जनशक्तीचे सचिन ढवळे थोडीशी चुरस निर्माण करतील अशी चर्चा आहे.