महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या ५ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी विधानभवनात झाला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अभिजित वंजारी (काँग्रेस), पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले जयंत आसगांवकर (काँग्रेस) आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले किरण सरनाईक (अपक्ष) यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली.
विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित या शपथविधी कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रीमंडळातील विविध विभागांचे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते.