वाढदिवशी देवेंद्र फडणवीस ‘आपत्ती व्यवस्थापना’त व्यस्त

73

रायगडच्या घटनेतील पीडितांसाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचार्‍यांकडून एक दिवसाचे वेतन

अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

भाजपाकडून सेवादिनाचे अनेक काकार्यक्रम

मुंबई, 22 जुलै
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या वाढदिवशी दिवसभर राज्यभरातील पावसाचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची माहिती घेत होते आणि सातत्याने बुलढाणा, यवतमाळ, अकोला प्रशासनाशी संपर्कात होते. दरम्यान, आज दिवसभर अनेक मान्यवरांनी त्यांना दूरध्वनी, ट्विटर इत्यादी माध्यमांतून शुभेच्छा दिल्या, तर भारतीय जनता पार्टीने आजचा दिवस सेवा दिन म्हणून साजरा केला.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे अलिकडेच भूस्खलनाची घटना घडली होती. त्यातील पीडितांसाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. त्याचे पत्र कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. दरम्यान, अहेरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उदघाटन कार्यक्रमाला आज देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीला जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे ते जाऊ शकले नाही. या कार्यक्रमाला त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. आज सकाळपासून ते विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीचा आढावा घेत होते आणि सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सच्या देखरेखीत सुमारे 110 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले, तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात तीन गावांतील सुमारे 400 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. विविध प्रशासनांच्या ते संपर्कात होते.


आज दिवसभर अनेक मान्यवरांनी दूरध्वनी करुन देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यातील अनेक मंत्री, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे इत्यादी मान्यवरांचा समावेश होता.