मुंबई : १ मे पासून सुरु होणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला महाराष्ट्रात इतक्यातच सुरवात होणार नाही असे स्पष्ठीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. तसेच १ मे पासून लसीकरण सुरु करण्यासाठी लस उपलब्ध नसल्याचे आरोग्य मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. या सर्व घडामोडीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लसीच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.
कोरोनावर संजीवनी ठरलेल्या लसीकरणातही मोदी सरकारच्या ढिसाळ कारभाराचे भोग देशाला भोगावे लागत आहेत. १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील देशाच्या तरुण कार्यशक्तीचे लसीकरण केंद्र सरकारने जाहीर केले, परंतु अत्यंत नियोजन शून्य मोदी सरकारने लसींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही, हे दुर्दैव आहे. जगात लसीकरण युद्धपातळीवर सुरू असताना व भारतात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव चालले असतानाही मोदी सरकारने दर्शविलेली बेफिकिरी अपराधी प्रवृत्तीची आहे, अशी टीका प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
.https://twitter.com/sachin_inc/status/1388060684169015301?s=08
देशातील युवावर्गाची जबाबदारी मोदी सरकारने राज्यांवर ढकलली पण आता लसीकरणातील दिरंगाई ही तरुणाईच्या जीवावर उठणारी आहे. ही दिरंगाई केवळ १८-४४ वयोगटात नाही. ४५ वर्षांवरील वयोगटातील लसीकरणही केंद्राने लशींचा पुरवठा नीट न केल्याने सातत्याने अडचणीत येत आहे. महाराष्ट्राला आतापर्यंत १,६३,६६००० लसी केंद्राने पुरवल्या. त्यातील १,६०,२७००० लसी महाराष्ट्र सरकारने जनतेला दिल्या आहेत. आता साठाच शिल्लक नसल्याने राज्यातील अनेक लसीकरण केंद्रे लसीअभावी बंद करण्याची नामुष्की ओढवत आहे असे सचिन सावंत यांनी बोलून दाखविले आहे.