गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या वादामुळे अभिनेत्री कंगना रनौत खूप चर्चेत आली आहे. आज सकाळी कंगनाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी ती पारंपरिक वेशात दिसून आली. हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात गजरा अशी तिने वेशभूषा केली होती. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रनौतने प्रसारमाध्यमांशी मोठ्या उत्साहाने संवाद देखील साधला.
यावेळी तीने, मला मुंबईत राहण्यासाठी फक्त गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असा टोला देखील लगावला. यावेळी प्रसारमाध्यमांनी तिला संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीसविषयी विचारणा केली. तुम्हाला मुंबईत परवानगी नाकारणाऱ्यांना ईडीची नोटीस आली त्याबद्दल काय वाटते, असे कंगनाला विचारण्यात आले. मात्र, कंगना रानौतने त्यावर बोलायचे पूर्णपणे टाळले.
गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि संजय राऊत यांच्यात ट्विटवर वॉर सुरू आहेत. रविवारी कंगना रनौत मुंबईमध्ये पुन्हा परतली आहे. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कंगना आणि तिच्या कुटुंबातील काही सदस्य देखील रविवारी मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर कंगना रानौतने जय महाराष्ट्र असे उद्गार केले.