प्रेम आंधळं असतं असं म्हणतात पण या अंधळेपणाची शिक्षा एका आजीला आणि एका छोट्या मुलाला मिळाली आहे. घटना नागपूरची आहे. प्रेम आणि लग्न करण्यास विरोध केला म्हणून युवकाने प्रेयसीची आजी आणि लहान भावाचा धारदार चाकूने खून केला.
शहरातील हजारीपहाड परिसरात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. प्रमिला मारोती धुर्वे (वय ७० ) आणि यश मोहन धुर्वे (वय १०) असे या आजी-नातवांची नावे आहेत. आरोपी अल्पवयीन आहे. या खुनाच्या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी गुंजन (वय २०, नाव बदलले आहे ) गुंजनची गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘इंस्टाग्राम’वरून तहसील परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मोहंमद (बदललेले नाव) याच्याशी ओळख झाली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मोहंमदने गुंजनशी फोनवरून मैत्री करीत प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
गुंजन गेल्या काही दिवसांपासून मोहंमदशी फटकून वागत होती. भेटणे टाळत होती. आजीने रागावल्यामुळेच गुंजन अशी वागत असल्याचा समज त्याने करून घेतला. गुरुवारी (ता. १०) दुपारी मोहंमद तिच्या घरी आला आणि प्रमिला यांच्यावर अकस्मात चाकू हल्ला केला. सोबतच छोट्या भावाला सुद्धा चाकू मारला त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.