बीड, सोलापूरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश

35

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ वनपरिक्षेत्रात नरभक्षक बिबट्या धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण झाल्याने सदरील बिबट्यांना जेरबंद अथवा गरज पडल्यास ठार मारण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यवन संरक्षक अनिल काकोडकर यांनी दिले आहेत.

आत्तापर्यंत अनेकांना बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांनी जीव गमावला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी असून बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी बिबट्यास ठार मारण्याची मागणी केली होती. दिलेल्या आदेशात नमूद आहे की, बिबटयाला जेरबंद,बेशुध्द करणे शक्य न झाल्यास सदर बिबटयाला अधिक मनुष्य हानी टाळण्याच्या दृष्टीने ठार मारण्याची परवानगी देण्यात येत आहे .

सदर कार्यवाही करण्यास मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक ) औरंगाबाद आणि मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक ) पुणे यांना व त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी इतर व्यक्ती यांना अधिकृत करण्यात येत आहे . सदर आदेश दिनांक ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वैध राहिल . शक्यतो सर्व पर्यत्न करून बिबटयाला जेरबंद/बेशुध्द करण्यास प्राधान्य द्यावे.

सदर बिबटयाला ठार मारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पारितोषक जाहिर करण्यात येऊ नये . आवश्यकतेनुसार Sniffer dog ची सहायता घेण्यात यावी . सदर बिबटयास जेरबंद/बेशुध्द आणि ते शक्य न झाल्यास त्याला ठार करण्याच्या कार्यवाहीला एकंदर नियोजनाकरिता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) पश्चिम , मुंबई हे समन्वय अधिकारी राहतील .