संपूर्ण जगभरात कोरोना रोखण्यासाठी लस बनवणारी अव्वल कंपनी असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांना लसींसाठी मोठ्या प्रमाणात फोन येत असून काही जणांकडून धमक्याही दिल्या जात असल्याची माहिती पुनावाला यांनी दिली होती. मला येणारे फोन कॉल्स अत्यंत वाईट बाब आहे. फोन करणाऱ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांचा समावेश देखील आहे, असं अदर पूनावाला यांनी म्हटलं होत. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.
यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य करत अदर पूनावाला आणि केंद्रातील मोदी सरकारला काही प्रश्न उपस्थित केले आहे. या संकटात पूनावाला यांना कुणी धमकावले होतं याचा खुलासा त्यांनी करायला हवा असे पटोले म्हणाले तसेच पुनावाला यांनी पुन्हा भारतात येऊन लसीचे उत्पन्न वाढवावे त्यांना काँग्रेस पूर्ण संरक्षण देईल असे विधान पटोले यांनी केले आहे.
पूनावाला यांना वाय प्लस सुरक्षा दिली होती. यामागचं कारण काय ? हेही तपासलं पाहिजे. त्यांनी सुरक्षा मागितली नसताना केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा पुरवली त्या मागचा खेळ काय आहे ? पूनावाला आणि केंद्र सरकारने याचा खुलासा करायला हवा असे पटोले म्हणाले. पूनावाला भारतात नसताना आणि त्यांनी मागणी केली नसताना त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली. रेकी करण्यासाठी केंद्र सरकारने हे केलं असावं असा संशय असल्याचे पटोले म्हणाले आहेत.