सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयात उपजिल्हाधिकारी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निगुडे गावा शेजारील दगड खाणमालक यांची आज बैठक झाली.
त्यावेळी निगुडे गावातील 157 घरांना काळा दगड खाणीतील भूसुरुंग स्फोटामुळे तडे गेले आहेत. त्यांना 23 लाख रुपयांची भरपाई खाण मालकांनी येत्या आठ दिवसात देण्याबाबत विचार करावा. अन्यथा संबंधित खाण मालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खाण मालकांना दिला.
महसुल विभागाच्या मदतीने त्या घरांचे सर्वेक्षण बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केले आहे. ते सुमारे 23 लाख एवढे झाले आहेत. ते देण्याची जबाबदार खाण मालकांची असताना ते टाळाटाळ करत आहे, अशी कैफियत उपसरपंच गवंडे यांनी मांडली.
यावेळी आमदार केसरकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, दोडामार्ग नायब तहसीलदार नाना देसाई, निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे व पदाधिकारी आणि खाण मालक उपस्थित होते.
निगुडे गावाशेजारील खाण मालकांनी तडे गेलेल्या घराची भरपाई लोकांच्या बॅंक खात्यामध्ये टाकायला हवी. त्यासाठी संबंधित खाण मालकांनी एकत्रित येऊन तडे गेलेल्या घरांच्या मालकांना भरपाई द्यावी, असे या बैठकीत ठरले आहे. असे आमदार केसरकर यांनी दिली.