परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी एचआर सीटीची टेस्ट करणे आवश्यक आहे. ही टेस्ट करताना सीटी स्कॅनसाठी जादा दर आकारणाराविरूध्द कठोर कारवाई करतानाच सीटी स्कॅन मशीन सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संबधितांना दिले आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. दररोज शेकडो रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी एच.आर. सिटीची टेस्ट करणे आवश्यक असते. ही टेस्ट करण्यासाठी सीटीस्कॅनसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारल्या जात आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांकडून वारेमाप पैसे उकळल्या जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.कोरोनासारख्या महामारीत रुग्ण व त्यांच्या कुटूंबियांची लूट करणे योग्य नाही. मात्र, असे असतानाही काही झारीतले शुक्राचार्य ही वेळही कॅश करू लागले असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे.
विशेषतः सीटीस्कॅन करताना लूट होऊ लागली असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. जिल्हाधिकार्यांनी याची गंभीर दखल घेत अशा तक्रारी आल्यास, पैसे जादा घेत असतील तर ती सीटी स्कॅन मशीन सील करण्याचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत.