राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सध्या १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. यावर मंत्री आदित्य ठाकरे यांनी आधी ट्विट करून मग ते डिलिट केलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य सरकार मोफत लस देणार असल्याचे जाहीर करून टाकलं. या सगळ्यावर अजित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली.
“मोफत लसीकरणाविषयी अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, असं ते म्हणाले. “ज्या निर्णयामुळे राज्यावर आर्थिक भार पडू शकतो, त्यावर निर्णय महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. असा निर्वाळा अजित पवारांनी दिला.
उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोफत लसीकरण करण्यावर चर्चा होणार आहे. तेव्हाच अंतिम निर्णय होईल, असं अजित पवारांनी सांगितल आहे. मात्र, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा, पुन्हा काय निर्णय होऊ शकतो, असं विचारल्या नंतर अजित पवारांनी माध्यम प्रतिनिधींना टोला लगावला.
“आत्ता मी काही बोललो आणि उद्या तिकडे मंत्रिमंडळ बैठकीत सगळ्यांच्या चर्चेत काही वेगळा प्रस्ताव मंजूर झाला तर उद्या पुन्हा माझी ब्रेकिंग न्यूज होईल. बघा अजित पवार हे म्हणाले होते आणि मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा उद्या काय तो निर्णय होईल. २४ तास प्रतीक्षा करा”, असा धिराचा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.