शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याबरोबरच माथाडी कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न व मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी सोमवारी लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून, त्याच्या नियोजनासाठी काल मुंबईत माथाडी भवनमध्ये आयोजिलेल्या सभेत श्री. पाटील व अन्य माथाडी नेत्यांनी मार्गदर्शन केले.
सर्व माथाडी कामगारांनी ही शेवटचीच लढाई आहे, असे समजूनच सोमवारच्या (ता. 14) लाक्षणिक बंदमध्ये सहभागी होऊन शासनाला एकजुटीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन माथाडी नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या सभेत केले.व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या हितासाठीच आमची आंदोलने असतात. 2000 मध्ये गॅट करार झाला आणि किरकोळ बाजारात परदेशी गुंतवणूकदार कंपन्या आल्या. किरकोळ बाजारातील छोटे व्यापारी संपविण्याचा हा कट असून, यापुढे माथाडी कामगारांचेही अस्तित्व नष्ट होण्याचा धोका आहे. आज माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सोमवारी अधिवेशन काळात होणारा संप नक्कीच निर्णायक ठरेल.’ असेही ते म्हणाले
माथाडी संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, रविकांत पाटील, दिलीप खोंड, पोपटराव देशमुख, खजिनदार गुंगा पाटील, ऍड.भारतीताई पाटील, रमेश पाटील, तसेच विविध टोळ्यांचे मुकादम, उपमुकादम व कार्यकर्ते उपस्थित होते.