प्रेम व्यक्त करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. पण प्रत्येकाचं प्रेम स्वीकारलं जाईलच असं नाही. त्यातल्या त्यात तुम्ही अल्पवयीन मुलीला प्रपोज कराल. तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागू शकतं. आता हेच बघा.
अश्लिल हावभाव करत शायरी लिहिलेली आणि प्रेम व्यक्त करणारा मजकूर असलेली चिठ्ठी अल्पवयीन मुलीच्या दिशेने फेकणार्या अरुणकुमार भगत (वय २२) याला विशेष जिल्हा न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी ३ वर्षांची सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.
पुण्यातील मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे २५ डिसेंबर २०१८ रोजी ही घडली होती. सदरील अल्पवयीन मुलगी घराकडे जात होती. त्यावेळी आरोपीने तिच्याकडे बघून अश्लिल वक्तव्य केले. त्यानंतर त्याने तिच्या दिशेने आय लव यु तसेच हिंदी शायरी आणि मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी फेकली होती.
तळेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. सदरील प्रकरणात पिडीत मुलीची साक्ष व आरोपीने फेकलेली चिठ्ठी हा पुरावा महत्वाचा ठरला. न्यायालयाने पुरावा ग्राह्य धरुन आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.