‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना, पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन ऑक्सीजन

7

महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता असून राज्याला विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात आली.

रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. त्याला रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करुन आज पहिली रेल्वे रवाना केली. परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी या एक्स्प्रेसला हिरवा दिवा दाखवून रवाना केले.


या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या पाच दिवसात एकशे दहा मे. टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असे केंद्र शासनाला सुचवले होते.

त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजूरी दिली असून यापुढील काळात प्राणवायूच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.