“पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का?- सुनील (अण्णा) शेळके

74


भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली होती. सकाळी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी घोषित केलं की १ तारखेपासून आम्ही १८ वर्षांवरील सगळ्यांचे आम्ही लसीकरण करणार आहोत. नंतर ४ वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का ? अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती आता पडळकरांच्या टीकेला आमदार सुनील (अण्णा) शेळके यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.


आमदार शेळके म्हणाले की, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना केवळ वैयक्तिक प्रसिद्धीसाठी पडळकर बेताल वक्तव्य करीत आहेत, असा हल्लाबोल शेळके यांनी केला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी आरोग्यमंत्र्यांविषयी पातळी सोडून बेताल वक्तव्य करणे म्हणजे कोरोनामध्ये लढणाऱ्या योद्ध्यांची चेष्टा केल्यासारखेच आहे, असे शेळके यांनी म्हटले आहे.


राज्याची स्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. कोरोनाचा हाहाकार चालू असताना अशा प्रकारची टीका करू नये. आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह राज्याची सर्व आरोग्ययंत्रणा स्वतःच्या जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी केलेली बेताल वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशाराही आमदार शेळके यांनी पडळकरांना दिला आहे. आता शेळके यांच्या टीकेला पडळकर काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.