भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्याचे जाहीर केले आहे. याचा अनावरण गोंधळ आज पहाटे झाला आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. पण त्याआधीच गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटेच त्याचं उद्घाटन केल्याचा दावा केला आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी उद्घाटन झाल्याचं जाहीर केले आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आले आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी आणि पडळकर हे पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचे काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होते. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असे म्हणत गनिमी काव्याने जाऊन गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. राज्यभरातील शेकडो बहुजन कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच गोपीचंद पडळकर यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली.