परमवीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातल्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. भाजपकडून अनिल देशमुख यांच्या राजिनाम्याची मागणी तीव्र होते आहे. कॉंग्रेसने मात्र अनिल देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे ऊभे राहत परमवीर सिंह प्रकरण ही भाजपची स्क्रीप्ट असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा दावा केला असून अनेक गंभीर प्रश्न ऊपस्थित करत भाजपवर टीका केली आहे. मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते.
पोलिसांनी राजकारण्यांवर आरोप केल्याचे हे काही देशातील पहिले प्रकरण नाही. याअगोदर २००२ मध्ये गुजरात पोलिस दलाचे प्रमुख डी.जी. वंजारा यांनी गृहमंत्री अमित शहांवर पोलिस दलाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. गुजरात पोलिसमधीलच वरीष्ठ अधिकारी संजिव भट यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर आरोप केले होते. तेव्हा नरेंद्र मोदींनी राजिनामा दिला होता का? असे प्रश्न सचिन सावंत यांनी यावेळी ऊपस्थित केले.
“परमवीर सिंह यांचे पत्र ही भाजपची स्क्रीप्ट आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला अमित शहा यांची भेट घेण्यासाठी जातात आणि त्यानंतरच हे पत्र बाहेर येतं. पत्र बाहेर येताच भाजपचे नेते त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात करतात. हा योगायोग नव्हे. सचिन वाझे हा परमवीर सिंह यांचा निकटवर्तीय होता. त्यामुळे चौकशीपासून वाचण्याकरिता त्यांनी हा प्रकार केला असल्याची शक्यात नाकारता येण्यासारखी नाही.” असेसुद्धा सचिन सावंत यावेळी म्हणाले.
विरोधी पक्ष सत्तेत असणार्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे याचे व्यवस्थित चित्रण करुन सत्ताधार्यांना अडचणीत आणायचे. सरकार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे हा भाजपचा धंदाच बनला आहे. विरोधी पक्षातील राज्यांवर दबाव बनवण्यासाठी केंद्रिय यंत्रणांना आपल्या दावणीला बांधायचे हे भाजपचे नित्याचे झाले आहे. अशाप्रकारे सचिन सावंत यावेळी बोलत होते.