परभणी : लॉकडाऊनमध्ये आजी, माजी आमदारांचे पगार थांबवा; मजुरांना करा आर्थिक मदत : संभाजी ब्रिगेड

11

आजी, माजी आमदारांचे पगार व पेन्शन वर्षभरासाठी थांबवून तो निधी टाळेबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या मजूर, कामगार, गरीब शेतकर्‍यांच्या मदतीसाठी देण्यात यावा याबाबतचे निवेदन काल शुक्रवारी (दि.26) संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिंतूर तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांना यांना देण्यात आले.

सदरील निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात मागील वर्षीपासून पावसाने आणि कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मागील वर्षीपासून सतत टाळेबंदी लावण्यात येत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेले हमाल, मजूर, रिक्षा चालक, छोटे व्यापारी, आणि शेतकर्‍यांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांनी 8 दिवसांची लॉक डाऊन केलं आहे. या कालावधीत सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी यांचे पगार चालूच आहेत, म्हणून कोरोना काळामुळे सरकार आर्थिक संकटात आहे आणि त्यामुळे मदत देऊ शकत नाही, मग त्यांवर उपाय म्हणून पुढील वर्षभरासाठी आमदारांचे पगार,पेन्शन वर करोडो रुपये खर्च होतात म्हणून त्यांचा पगार व पेन्शन थांबवावी आणि त्यांची पगार गोरगरीब मजुरांच्या मदतीसाठी वापरण्यात यावी. असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे, उपाध्यक्ष विजय पाटील, कार्याध्यक्ष सोपान धापसे, शहर अध्यक्ष पिंटू डोंबे, शहर उपाध्यक्ष पिंटू रोकडे, रत्नदीप शेजावळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.