पतंजलीच्या ‘कोरोनिल’ या औषधाचे लाँचिंग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानंतर पतंजलीने ‘कोरोनिल’ या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमाणपत्र मिळाल्याचे जाहिर केले.
यावर जागतिक आरोग्य संघटनेने ट्विट करत कोरोना उपचारांसाठी अशा कोणत्याही प्रकारच्या आर्युवेदिक अथवा पारंपारिक औषधांना मान्यता दिलेली नाही किंवा याबाबत कोणताही अभ्यास झालेले नाही असे स्पष्ट केले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशननेही निवेदनात म्हंटले की, ‘करोना प्रतिबंधासाठी हे औषध उपयुक्त असेल तर लसीकरणावर सरकार ३५ हजार कोटी रुपये का खर्च करत आहे? आरोग्यमंत्री जर औषधाचा प्रचार-प्रसार करत असतील तर लसीकरणाची आवश्यकता नाही का, असे प्रश्नही ‘आयएमए’ने उपस्थित केले आहेत. तसेच “आरोग्य संघटनेने दिलेले हे स्पष्टीकरण म्हणजे भारताला दिलेली चपराक आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताचा अपमान झाला आहे.
कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे नसताना आरोग्यमंत्र्यांनी अशाप्रकारे जाहिरात करणे व लोकांना औषधाचा वापर करण्याचे आवाहन करणे योग्य आहे का? असा प्रश्नही आयएमएने उपस्थित केला आहे. तसेच औषधाची परिणामकारकता तपासण्यासाठी कोणत्या चाचण्या झाल्यात? कोणत्या रुग्णांचा यात समावेश होता? व कोणत्या पुरावे, निकषांवर ‘डीसीजीआय’ने ही मान्यता दिली याबाबतचे स्पष्टीकरणही आयएमए’ने मागितले आहे.