पवारांची पॉवर ! ममता दीदींच्या मदतीला शरद पवार पश्चिम बंगालला जाणार ?

13

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून निघालं आहे. नुकतंच अनेक आमदारांनी आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजप मध्ये प्रवेश करत आहेत. भाजपचे नेते अमित शहा यांनी बंगालची सगळी सूत्र हाती घेतल्याने पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल असा राजकीय अंदाज आहे.

त्यामुळेच आता सत्ता कायम ठेवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर कडवं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळेच त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे थेट पश्चिम बंगाल गाठू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. या शक्यतेला खुद्द राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी दुजोरा दिला आहे.

ममता बॅनर्जी या पुढील महिन्यात जानेवारीत कोलकातामध्ये भाजपविरोधी मेळाव्याची तयारी करत आहेत. त्यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. माध्यमांच्या वृत्तानुसार, शरद पवारांशी चर्चेदरम्यान ममतांनी त्यांना आमंत्रणही दिले आहे. इतर विरोधी पक्षातील नेते देखील एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.