२०२४ ला परतफेड करा, ही जागा निवडून यायलाच हवी – जयंत पाटील

42

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या ४ हजार मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. २०२४ ला याची परतफेड करा, चाळीसगाव विधानसभेची जागा निवडून यायलाच हवी असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त पाटील चाळीसगावात होते. चाळीसगावात त्यांनी राष्ट्रावादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एकनाथ खडसेदेखील ऊपस्थित होते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावतीने राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत आहे. यामध्ये पाटील अनेक मतदारसंघात जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहे. पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी पाटलांचा हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि यांस यशसुद्धा येत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमादरम्यान स्वगृही परतत असल्याचे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात येत आहे. आज जयंत पाटील चाळीसगावात होते.

‘राष्ट्रवादी परिवार संवाद हा कुटुंबातला संवाद आहे. या संवादाच्या माध्यमातून काही सूचना याव्यात आणि त्यातून पक्षाच्या संघटनेत सुधारणा व्हावी हे अपेक्षित आहे. कार्यकर्त्यांची एक मोठी फळी इथं आहे. नेते व पदाधिकाऱ्यांबद्दल असलेल्या सहानुभूतीचं रूपांतर मतांमध्ये करा,’ असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. तसेच २०१९ च्या पराभवाची परतफेड करायची आहे. महिला, युवक, युवती, विद्यार्थ्यांनी झपाट्याने कामाला लागा. शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचवा असेसुद्धा पाटील यावेळी म्हणाले.

एकनाथ खडसे यांचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. ‘खडसे साहेबांसारखे अनुभवी नेते आपल्याला मिळाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फार उपयोग होईल याबाबत मनात शंका नाही,’ असं पाटील म्हणाले. खडसेंनीसुद्धा यावर ऊत्तर देतांना ‘ही जागा जिंकणे कठीन नाही’ असा विश्वास व्यक्त केला आहे.
‘या तालुक्यातील कार्यकर्ता हा नेत्यावर प्रेम करणारा आहे. मागे जे झालं ते विसरा आणि कामाला लागा, असं सांगतानाच, राजीवदादा तुझ्या पाठिशी आहोत, असं आश्वासनही खडसे यांनी दिलं. यावेळी भाजपमधील अनेक खडसे समर्थकांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.