मागील खूप दिवसांपासून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुपली आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शाब्दिक चकमकीचे खेळ खेळत मुख्यमत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना नववर्षाला फोन केला. मुख्यमंत्र्यांनी फोन करुन मला या वर्षीची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे, असं मुख्यमंत्री नांगरे पाटील यांना म्हणाले होते. नांगरे पाटलांनी खास फेसबुक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांच्या फोनबद्दलचा खास अनुभव शेअर केला आहे.
मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला गेला. विश्वासराव मला या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे. रात्रभर तुम्ही काम करून थकाल. मी दुपारी एक वाजता येतो, असे मुख्यमंत्री फोनवर म्हणाल्याचं नांगरे पाटलांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय बातमी पेरली आहे… हे मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचे फोन उचलत नाही, शिवसैनिकांना फाट्यावर मारतात ती व्यक्ती मध्यरात्री एका मेसेजचं उत्तर देते हे अतिशयोक्ती आहे. PR टीमने कितीही उचलून धरलं तरी लोकं दूध खुळी नाही, आणि केलं जरी असेल तरी ते त्यांचं काम आहे, महाराष्ट्रावर उपकार नाही, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.