‘पंढरपूर-मंगळवेढ्यातील जनतेने महाविकास आघाडीला नाकारून चपराक लगावली’

27

पंढरपूर अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीचा काल निकाल लागला. या निवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे विजयी झाले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांचा 3,733 मतांनी पराभव केला.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी चुरशीची लढत झाली. राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या या पोटनिवडणुकीची मतमोजणी काल पंढरपूर इथं पार पडली. या निवडणूकीसाठी 2 लाख 24,068 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

दरम्यान, या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी आणि महाविकास आघाडीत जुगलबंदी रंगली आहे. यातच आता भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी देखील महाविकास आघाडीवर टीका केली आहे. पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुक ही महविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. स्व.भारत नाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेला आघाडीच्या नेत्यांनी सहानुभूतीच्या लाटेवर नेण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला आहे.

भावनिक आव्हान, अर्ध मंत्रिमंडळ ठाण मांडून मुक्कामी, सरकारी यंत्रणांचा हवा तसा वापर असे असताना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रशांत परिचारक यांच्या उत्तम नियोजनामुळे जनतेने आशीर्वादाचा कौल भाजपाच्या पदरात दिला असे त्यांनी म्हटले आहे.
जनतेने महाविकास आघाडीला पुन्हा एकदा नाकारून चपराक लगावली आहे. भाजयुमो प्रदेशाचे व जिल्ह्याचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सलग बारा तेरा दिवस मेहनत घेत होते,त्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो असे त्यांनी म्हटले आहे.