‘नदीपात्रात मृतदेह देशातील व्यवस्था अपयशी ठरतेय, हे आता लोकांना दिसतंय’

11

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलेला दिसत आहे. त्यामुळे नदीपात्रात अशाप्रकारे मृतदेह टाकण्याच्या घटना समोर येत आहेत. भारतात अशाप्रकारे नदीत मृतदेह फेकण्याची घटना आतापर्यंत माझ्या तरी ऐकिवात नव्हती. ज्या नदीत कोरोना रुग्णांचे मृतदेह टाकण्यात आले आहेत, त्या नदीचे पाणी अनेक लोक पिण्यासाठी वापरतात. कोट्यवधी लोक त्या नदीवर अवलंबून आहेत. असे सूतोवाच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. तिथे कोरोनाला नियंत्रित करण्यात तिथल्या राज्य सरकारला अपयश आल्याचे दिसत आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला स्मशानभूमी कमी पडत असल्यामुळे नाईलाजाने मृतदेह नदीत फेकले जात असल्याचे दृश्य अतिशय क्लेशदायक असल्याचे पाटील म्हणाले.

देशातील व्यवस्था कशी अपयशी ठरत आहे, हे आता देशातील लोकांना दिसायला लागले आहे. या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर सर्वांचे लसीकरण करणे हाच मार्ग केंद्र सरकारकडे आहे. त्यासाठी आपल्या देशातील वैद्यकीय कारखान्यांना लस तयार करण्याची परवानगी देऊन देशातील लोकांसाठी काही दिवसात लस उपलब्ध करायला हवी, हा यातून बाहेर निघण्याचा मार्ग आहे, अशी सूचना जयंत पाटील यांनी केली.

तसेच केंद्र सरकारने देशात सध्या तीन लशींना मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे उपलब्ध इतर लशींनाही केंद्राने परवानगी द्यायला हवी. बाहेरून लस आणण्याऐवजी देशात असलेल्या कारखान्यांचा वापर करून लस देशातच निर्माण करायला हवी. यातून तयार केलेली लस पहिल्या सहा महिन्यातच दिली गेली तरच महामारी आटोक्यात येईल, असे मत जयंत पाटील यांनी मांडले.