सोलापुर जिल्ह्यातील भाजपचे नेते कल्याणराव काळे हे 6 वाटेवर असल्याच्या चर्चा रंगत होत्या. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि कल्याणराव काळे यांच्यात बैठक होणार आहे. पंढरपुर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कल्याण काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकतो.
कल्याणराव काळे हे सोलापुर जिल्ह्यातील पंढरपुर येथील आहेत. सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. कल्याणराव काळे हे पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. पक्षात घुमसट होत असल्याचे कारण देत २०१४ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी कल्याणराव काळे यांनी पुन्हा कॉंग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. परंतू महाराष्ट्रात राजकीय वेगवान घडामोडी घडत पुन्हा शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकासआघाडी सरकार सत्तेत आले.
आता पुन्हा कल्याण काळे यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे. बैठकीदरम्यानच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगीतले जात आहे. पंढरपुर पोटनिवडणुकीवर मात्र या घटनेचा परिणाम होणार हे निश्चित आहे.