दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना, परीक्षा कशा घेऊ शकतो, यासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे.
शाळेतील दहावीची एकूण विद्यार्थीसंख्या लक्षात घेऊन त्यांची सकाळ आणि दुपार अशा दोन गटांत विभागणी करून परीक्षा घेतल्यास, गर्दी न होता १५ दिवसांत परीक्षा पार पाडली जाऊ शकते.
तसेच यावेळी शाळेमध्ये केवळ परीक्षार्थी, संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांनाच प्रवेश दिला, तर नियोजन व्यवस्थित पार पडू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच परीक्षा केंद्रांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था, निर्जंतुकीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास शाळांकडून आवश्यक ती खबरदारी जबाबदारी म्हणून नक्कीच पार पाडली जाईल, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.