ठाणे प्रतिनिधी आशा रणखांबे
“गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कडक पावले उचलणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक माणूसही दडलेला असतो. पोलिसांवर टीका करण्याआधी त्यांच्यातला माणूसही समजून घेण्याची नितांत गरज असल्याचे मत पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
कुलस्वामिनी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखक व्यंकट पाटील यांच्या ‘यशवंत’ कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात पानिपतकार विश्वास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी बोलत होते. यशवंत कादंबरीचे प्रकाशन नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले . त्यावेळी विचारपीठावर पानिपतकार विश्वास पाटील, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, डीसीपी डॉ. राठोड , मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कुलस्वामिनी प्रकाशनाचे प्रकाशक, लेखक अरुण हरकारे, शारदा प्रकाशनचे प्रकाशक प्रा. संतोष राणे, लेखक व्यंकट पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले , वर्दी असूनही माझे मित्र व्यंकट पाटील यांना कधी गर्व झाला नाही. माणूस ज्या मातीतून येतो, त्या मातीचा सुगंध सोबत घेऊन येतो.
त्याच मातीतील कसदार साहित्यिक म्हणजे लेखक, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट पाटील. पोलीस खाते असो वा साहित्य, व्यंकट पाटील जेथे जातील तेथे झोकुन काम करतात. गुन्हेगाराची मानगुट पकडतात. मानगुट गुन्हेगाराची असो की कथासूत्राची . नेमक्या कथासू्त्राच्या मानगुटीवर बसण्याची कला त्यांच्याकडे आहे.यशवंत कादंबरी वाचताना मी अचंबित झालो.कथा आणि कादंबरी यात फरक असतो. कथा ही वेलबूटीच्या रुमालासारखी असते तर कादंबरी ही शालू पैठणीसारखी असते. पोलीस खात्यातील पंचनाम्याची भाषा एवढी क्लिष्ट असताना सुद्धा अशा भाषेतून व्यंकट पाटील पुढे आलेले आहेत. पोलिसांच्या वर्दित जसा रुबाब असतो तसाच रुबाब व्यंकट पाटील यांच्या शब्दांमध्ये आहे.
यशवंत ही कादंबरी रहस्य कथा नाही तर हे खऱ्या अर्थाने निखळ वाङ्गमय आहे, उत्कट वाङ्गमय आहे. यशवंत कादंबरी वाचून जाणवले की, एका पट्टीच्या लेखकाची ही लेखणी आहे. “कुलस्वामिनी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखक व्यंकट पाटील लिखित ‘यशवंत’ कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात पानिपतकार विश्वास पाटील बोलत होते. यशवंत कादंबरीचे प्रकाशन नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवीं अशोक बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले . त्यावेळी व्यासपीठावर पानिपतकार विश्वास पाटील, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, डीसीपी डॉ.विनय राठोड , मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेन्द्र वाबळे, कुलस्वामिनी प्रकाशनाचे प्रकाशक, लेखक अरुण हरकारे, शारदा प्रकासनाचे प्रकाशक प्रा. संतोष राणे, लेखक व्यंकट पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशनाप्रसंगी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के म्हणाले, ” यशवंत कादंबरीत व्यंकट पाटलांनी पोलीस खात्यातील अनुभव समर्पकपणे मांडले आहेत. ही कादंबरी निश्चितच सर्वाना प्रेरणादायी ठरेल. अत्यंत साध्या, सरळ भाषेत त्यांनी लेखन केलेले आहे.” अशा शब्दात महापौर नरेश म्हस्के यांनी लेखकाचे कौतुक केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अशोक बागवे म्हणाले, ” व्यंकट पाटील हा माणुस मराठी भाषेवर प्रेम करणारा आहे. मराठी मातीत ते जन्माला आले आहेत. मराठी भाषेचे ऋण फेडण्याची ताकद त्यांच्या रक्तात असल्याने ते लिहितात. आत जे असतं तेच पोटातून ओठात येते तोच माणुस जे लिहितो तोच खरा लेखक असतो. व्यंकट पाटील हे खरे लेखक आहेत. शब्दांना सुद्धा मायेचा ओलावा असतो. तोच ओलावा लेखकाकड़े आहे. यशवंत ही कादंबरी नुसती कथा नाही, त्यात निसर्ग वर्णन, व्यक्तिचित्रण सुंदर केलेले आहे. पुढे काय होईल, ही उत्कंठा आहे, ते खरे साहित्याचे मर्म आहे. मराठी मातीचा डीएनए व्यंकट पाटील यांच्या लेखणीत उतरला आहे . साहित्यिक हा कणव असलेला पाहिजे. त्याच्या मनाची माती असली पाहिजे. कवी ना. धो. महानोर म्हणतात की, गाईचं शेण जमिनीवर पडल्यावर त्या शेणाला जशी माती चिटकते तसे अनुभव लेखकाच्या ह्रदयाला चिकटले पाहिजेत. कला जेवढे बळ देते तेवढे कोणीही देत नाही.व्यवस्था आणि अवस्था एकत्र येण्यासाठी साहित्य आवश्यक आहे. गुन्हेगार हा गुन्हेगार नसतो तो सुद्धा माणुस असतो, या कादंबरीतल्या शेवटच्या ओळी डोळ्यात पाणी आणतात.”
अप्पर पोलीस आयुक्त कल्याण परिक्षेत्र श्री. दत्तात्रय कराळे , मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. सोहळ्यात चित्रकार सतीश खोत यांचाही सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या योजना घरत , विश्वविक्रम करणारे जीवनसंघर्षकार कवी – लेखक नवनाथ रणखांबे( साहित्य सेवा पुरस्कार) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता माळी यांनी केले. या प्रकाशन सोहळ्यास पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि अनेक ठाणेकर रसिक उपस्थित होते.