कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत जात आहे. तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज दिला आहे. येत्या 17 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमे अंतर्गत बालकांना पोलीओ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोना अद्याप कमी झाला नाही. त्याचा धोका अजुनही आहे. त्यामुळे सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे पाळणे हे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासोबतच लसीकरणासाठी माहिती संकलित करताना अचूकता ठेवा तसेच चाचण्यांची संख्या वाढवा, अशा सूचना देत येत्या 17 जानेवारी 2021 रोजी देण्यात येणारे पल्स पोलिओ लसीकरण बालकांना करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, पल्स पोलिओ लसीकरण, कोविड लसीकरण नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.