दिल्लीतील एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे हा तरुण जामीनावर सुटलेला असून थेट पोलिसांना फोन लाऊनच त्यानी ही धमकी दिल्याचे समजते.
आरोपीचे नाव सलमान असून तो २२ वर्षांचा आहे. दिल्लीतील खजुरी खास स्टेशनमधील पोलिसांनी त्यास अटक केली असून, चौकशी केल्यानंतर त्याने भलतेच कारण सांगीतले आहे. मला पुन्हा जेलमध्ये जायचे होते म्हणून असे कृत्य केल्याचे त्याने कबुल केले आहे.
पोलिसांनी आरोपी सलमानला अटक केल्यानंतर त्याचा रेकॉर्ड चेक केला असता, त्याच्यावर अगोदरपासूनच विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामीनावर बाहेर अाहे. त्याला पुन्हा जेलमध्ये जायचे असल्यामुळे त्याने हा धमकीचा फोन केल्याचे म्हटले आहे.
याअगोदरसुद्धा पंतप्रधानांना धमकी देण्याचे असे प्रकार घडले आहे. जानेवारी महिन्यात दिल्लीतीलच एका तरुणाने असेच कृत्य केले होते. मात्र तो मानसिक त्रासाने ग्रस्त असून दारुच्या नशेत त्याने असे केल्याचे समोर आले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा असल्यामुळे काही मोठ्या अधिकार्यांकडूनसुद्धा सलमानची चौकशी केली जाणार आहे.