तब्बल 200 ब्रास वाळूसह पोकलेन, जेसीबी ताब्यात; एकूण दीड कोटींचा मुद्देमाल हस्तगत

62

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलिसांनी मूळी व दुसलगाव शिवारात वाळूचे अवैध मार्गाने उत्खनण करून तब्बल 200 ब्रास वाळूच्या साठ्यासह तब्बल एक कोटी 56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गंगाखेड तालुक्यात नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करीत वाळूची चोरट्या मार्गाने सर्रास वाहतूक होऊ लागली आहे. मूळी व दुसलगाव शिवारात पोकलेन, जेसीबी मशिनच्या सहाय्याने वाळूचे अवैधरित्या उत्खनन होत असल्याची माहिती गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांना मिळाली होती.

त्यावरून त्यांनी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसह छापा टाकला होता. त्यावेळी तेथे एक पोकलेन मशीन, दोन जेसीबी मशिनच्या सहाय्याने वाळूचे उत्खनन होत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी याप्रकरणी कारवाई करीत त्यातील साठा केलेली वाळू जप्त केली.

याबाबत त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. साठवलेल्या वाळूचे मोजमाप केले. तब्बल दोनशे ब्रास वाळू तेथे साठवून ठेवली असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 9) पोलीस कर्मचारी रतन सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.