केंद्रातील तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता दोन महिने होऊन गेले आहेत. तरीही कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढत असलेला पाठिंबा पाहता सरकारने धास्ती घेतल्याचं सध्या चित्र आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण मिळाले होते.
या हिंसाचारावर सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांचं कौतुक केलं. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
पोलिसांना परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे समजताच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, आंदोलक त्याने देखील मागे सरले नाहीत. लाल किल्ल्यावर ताबा मिळवून विविध झेंडे या आंदोलकांनी फडकावले. तर, लाल किल्ल्यातील सामग्रीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
पोलिसांच्या गाड्याचे मोठे नुकसान झाले. या सर्व घटनेमध्ये पोलिसांनी अद्भुत संयम राखला. शस्त्र असून सुद्धा आंदोलकांवर त्यांनी ते चालवले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. अनेक पोलीस हे गंभीर जखमी देखील झाले आहेत. त्यांच्या धैर्याचं कौतुक असल्याचा उल्लेख काल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.