पोलिस हवालदार सखाराम भोये यांच्या आत्महत्येस पोलीस निरीक्षक जबाबदार

18

नालासोपारा येथे तुळींज पोलीस ठाण्यातच एका हेड कॉन्स्टेबल सखाराम भोये यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. या आत्महत्येस दोषी असलेले तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुनील भुसारा यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती.

सखाराम भोये यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांची मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांची तुळिंज पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

भोये यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलीस हवालदार सखाराम भोये आदिवासी समाजाचे होते. तसेच ते अत्यंत प्रामाणिक आणि सरळ स्वभावाचे होते. अशा प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष पोलीस हवालदारास न्याय मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे, अशी विनंती आमदार भुसारा यांनी केली होती.